NITI Aayog : रोजगार आणि कौशल्यविकासावर विशेष भर देणार; नीती आयोगाच्या बैठकीत मोठा निर्णय
भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टाच्या दिशेने आज एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाच्या (NITI Aayog) गव्हर्निंग कौन्सिलची 11 वी बैठक पार पडली.

NITI Aayog : भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टाच्या दिशेने आज एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाच्या (NITI Aayog) गव्हर्निंग कौन्सिलची 11 वी बैठक पार पडली.
या बैठकीत रोजगारनिर्मिती, कौशल्यविकास, मानवी विकास, आरोग्य, उद्योजकता आणि राज्यांच्या सर्वांगीण विकासावर सखोल चर्चा करण्यात आली. केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये विकासाचा (NITI Aayog) समन्वय साधत ‘विकसित भारत 2047’च्या आराखड्याला गती देणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश असणार आहे.
राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक, केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले.
देशातील तरुणांची वाढती संख्या, बदलणारे तंत्रज्ञान आणि जागतिक स्पर्धा लक्षात घेता रोजगारनिर्मिती हा बैठकीतील सर्वात महत्त्वाचा विषय मानला जात आहे. भविष्यातील रोजगारांच्या गरजा लक्षात घेऊन कौशल्यविकासाच्या (NITI Aayog) नव्या धोरणांवर चर्चा करण्यात आली. कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल तंत्रज्ञान, उत्पादन क्षेत्र, सेवा क्षेत्र आणि स्टार्टअप इकोसिस्टम यांच्याशी संबंधित कौशल्यांना प्राधान्य देण्यावर भर देण्यात आला.
केंद्र सरकारच्या मते, केवळ रोजगार उपलब्ध करून देणे पुरेसे नाही, तर गुणवत्तापूर्ण आणि उत्पादक रोजगार निर्माण करणे तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे उद्योजकता, स्थानिक उद्योग आणि जिल्हास्तरीय विकास यांनाही बैठकीत महत्त्व दिले गेले.
दरम्यान, टीम इंडियाच्या संकल्पनेवर भर देत, केंद्र सरकार राज्यांना विकास प्रक्रियेतील भागीदार म्हणून पाहत आहे. त्यामुळे विविध राज्यांच्या विकास मॉडेल्स, स्थानिक गरजा आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करण्यात येणार आहे. राज्य सरकारांकडून पायाभूत सुविधा, गुंतवणूक, शिक्षण, आरोग्य आणि उद्योगवाढीबाबतच्या प्रस्तावांवरही चर्चा करण्यात आली.






