Udayanraje Bhosale: महाबळेश्वरकरांना उदयनराजे यांच्या ‘जनता दरबार’ची प्रतीक्षा; ‘ऑन-द-स्पॉट’ निकालाची आस
Udayanraje Bhosale: दुर्गम आणि डोंगराळ भागातील महिला व वृद्धांना मिळणार मोठा दिलासा; रस्ते, पाणी आणि आरोग्याचे प्रश्न स्थानिक पातळीवरच सुटण्याची आशा.

Udayanraje Bhosale – खासदार उदयनराजे भोसले यांच्या आगळ्यावेगळ्या कार्यपद्धतीची भुरळ संपूर्ण महाराष्ट्राला आहे. सर्वसामान्य जनतेचा एखादा प्रश्न असो वा प्रशासनाचा ढिसाळ कारभार, तात्काळ आणि ऑन-द-स्पॉट निकाल देण्याची महाराजांची शैली नेहमीच जनसामान्यांची मने जिंकून घेते. याच पार्श्वभूमीवर, महाबळेश्वर तालुक्यातील प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी महाबळेश्वर तालुक्याकडे लक्ष देऊन महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दुर्गम भागातील लोकांना दिलासा द्यावास अशी अपेक्षा महाबळेश्वरकरांकडून व्यक्त होत आहे.
महाबळेश्वर तालुक्याचा दुर्गम आणि डोंगराळ भाग लक्षात घेता महिला, वृद्ध व्यक्ती आणि सर्वसामान्य नागरिकांना सातारा येथील कार्यालयात जाऊन प्रश्न सोडविणे नेहमीच सोयीचे होत नाही. अनेक ज्येष्ठ नागरिकांना आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी प्रवासाच्या अडचणीमुळे साताऱ्याला जाणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत उदयनराजे यांनी महाबळेश्वर तालुक्यातच जनता दरबार आयोजित केला तर ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न, आरोग्य, रस्ते, पाण्याचे प्रश्न स्थानिक पातळीवरच सुटू शकतीलअसी चर्चा लोकांमध्ये आहे.
महिलांनाही घरगुती, सामाजिक किंवा शासकीय योजनांचे प्रश्न उदयनराजेंसमोर मांडता येतील. यामुळे दुर्बल घटकांना आणि ज्येष्ठांना मोठा आधार मिळणयाची आशा व्यक्त होत आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, महाबळेश्वर तालुक्यात खासदार उदयनराजे भोसले यांच्या जनता दरबाराचे आयोजन झाल्यास पक्षाला आलेली मरगळ झटकून टाकण्यास मदत होईल, अशी चर्चाराजकीय वर्तुळात आहे.
नावाचा गैरवापर करणाऱ्यांना बसणार चाप
तालुक्यात आणि परिसरात उदयनराजे यांच्या नावाचा गैरवापर करून स्वतःची पोळी भाजून घेणारे काही महाभाग सक्रिय असल्याचे सांगितले जाते. उदयनराजे यांच्या जनता दरबारामुळे अशा घटकांना चांगलाच चाप बसेल. अशा लोकांना उदयनराजे त्यांच्या खास शैलीत आळा घालतील आणि या गैरप्रकाराला कायमचा पूर्णविराम मिळेल, असा विश्वास सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.





