हलगीच्या कडकडाटात उदयनराजे यांची बैलगाडीतून सवारी

सातारा -राज्य सरकारने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर साताऱ्याजवळ देगावच्या माळावर प्रथमच बैलगाडा शर्यतींचा थरार शौकिनांनी अनुभवला. खा. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डोक्याला मुंडासे बांधून आणि बैलांचा कासरा हातात घेऊन उदयनराजे बैलगाडीतून शर्यतींच्या ठिकाणी आल्यानंतर युवकांनी जल्लोष केला.
या शर्यती पाहण्यासाठी पंचक्रोशीतील दहा हजाराहून अधिक लोक जमा झाले होते. उदयनराजेंचा वाढदिवस गुरुवार, दि. 24 रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त उदयनराजे मित्रसमूहातर्फे देगावच्या माळावर झालेल्या शर्यतींमध्ये 50 हून अधिक बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. सकाळी आठ वाजल्यापासून बैलगाडी धावेच्या दुतर्फा शौकिन उपस्थित होते. हलगी कडाडल्यावर बेफाम धावणाऱ्या बैलगाड्या, जोरदार शिट्ट्या, हवेत उडणारी उपरणी यामुळे दहा वर्षांपूर्वीचा ग्रामीण माहोल पुन्हा जिवंत झाला.
खा. उदयनराजे भोसले यांचे बैलगाडीतून दुपारी 1 वाजता आगमन झाले. उदयनराजेंनी पुन्हा एकदा कॉलर उडवली आणि युवकांनी “वाघ हाय वाघ’ अशा घोषणा दिल्या. संपूर्ण माळाला उदयनराजेंनी बैलगाडीतून फेरी मारली आणि ते मंचावर दाखल झाले. उदयनराजे तब्बल दोन तास उपस्थित राहून या शर्यतींचा आनंद लुटला. या शर्यतींमध्ये शेंद्रे, ता. सातारा येथील संजय पोटेकर यांच्या बैलगाडीने एक लाख 11 हजार 111 रुपयांचे पहिले बक्षीस जिंकले.





