Uday Samant: दुष्काळाचं संकट भयावह ; शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम ; उदय सामंतांचा बळीराजाला विश्वास
Uday Samant: राज्यातील दुष्काळी परिस्थिती भयावह असून, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

Uday Samant: राज्यातील दुष्काळी परिस्थिती भयावह असून, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेत असून, सरकार बळीराजाच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचं सामंत यांनी सांगितलं.
दुष्काळाच्या परिस्थितीवर विरोधकांनी राजकारण करू नये. शेतकऱ्यांमुळेच आपल्या घरातील चूल पेटते, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राने एकसंघपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची ही वेळ आहे, असं आवाहनही त्यांनी केलं.
कोकणात सर्वेक्षण आणि पंचनाम्यांचे आदेश Uday Samant:
कोकणातील परिस्थितीबाबत बोलताना सामंत यांनी पुढील चार-पाच दिवस पाऊस न झाल्यास नुकसानीचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता व्यक्त केली. २६५ तालुक्यांच्या यादीत एखाद्या तालुक्याचं नाव नसलं, तरी रत्नागिरी जिल्ह्यात सर्वेक्षण करण्याचे आदेश पालकमंत्री म्हणून दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
रायगडमध्ये भरतशेठ गोगावले, तर सिंधुदुर्गमध्ये नितेश राणे यांनीही सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. कोकणातील भात आणि नाचणी उत्पादक शेतकऱ्यांनाही दुष्काळाचं संकट निर्माण झाल्यास मदत करण्याची सरकारची भूमिका असल्याचं सामंत यांनी सांगितलं.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि तळ कोकणातील विविध भागांत सर्वेक्षण सुरू असून पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोकण, विदर्भ, मराठवाडा किंवा खानदेशातील कोणत्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही, असा दावा सामंत यांनी केला.
दापोलीतील अणुऊर्जा प्रकल्पाबाबत काय म्हणाले? Uday Samant:
दापोलीतील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाबाबत बोलताना सामंत यांनी अद्याप प्रकल्पाची अधिसूचना निघालेली नसल्याचं स्पष्ट केलं. सामंजस्य करार झाला म्हणजे प्रकल्प प्रत्यक्षात आला, असं होत नाही, असंही त्यांनी सांगितलं.
स्थानिक शेतकरी आणि प्रकल्पबाधितांना विश्वासात घेतल्याशिवाय उद्योग विभाग पुढे कोणतंही पाऊल उचलणार नाही, अशी भूमिका उद्योगमंत्री म्हणून सामंत यांनी स्पष्ट केली.





