Uday Samant : “काम न करणाऱ्यांना डच्चू…” उदय सामंतांनी दिला ३० दिवसांचा अल्टिमेटम
Uday Samant : पुणे जिल्हा संपर्कप्रमुख उदय सामंत यांनी ३० दिवसांत मागवला कामाचा अहवाल; कार्यकारिणी बरखास्त करून पदाधिकाऱ्यांना दिले 'प्रभारी' पद.

Uday Samant – शिवसेना संघटनेतील जे पदाधिकारी पदे घेऊन काम करीत नाहीत. त्यांना पदावर ठेवायचे की नाही. याबाबत निर्णय घेण्यात येईल. कार्यकारिणी बरखास्त होऊन आताचे पदाधिकारी आजपासून प्रभारी म्हणून काम करतील. पुढील ३० दिवस मतदारसंघातील संघटनेच्या कामाची माहिती घेतली जाईल. चांगले काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदांवर कायम ठेवले जाईल.
चांगले काम न करणाऱ्यांना पदावरून दूर करण्यात येणार असल्याचा इशारा शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिला. पुणे, मावळचे संपर्कप्रमुख झाल्यानंतर सामंत यांनी शुक्रवारी आढावा बैठक घेतली. पिंपरी,चिंचवड,भोसरी,मावळ विधानसभा मतदारसंघातील सर्व शिवसेना,महिला आघाडी, युवासेना, युवती सेनेच्या कामाचा आढावा घेतला. थेरगाव येथील मोरया बॅंकेट हॉलमध्ये बैठक पार पडली.
शिवसेना उपनेते खासदार श्रीरंग बारणे, उपनेते इरफान सय्यद, उपनेत्या सुलभा उबाळे, शहरप्रमुख नगरसेवक नीलेश तरस, जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर, समन्वयक बाळासाहेब वाल्हेकर, उपजिल्हाप्रमुख दिलीप पांढारकर ,शरद हुलावळे, नगरसेवक निलेश बारणे, मावळ तालुका प्रमुख रामभाऊ सावंत , विशाल हुलावळे , युवा सेना जिल्हा प्रमुख सागर पाचारणे, युवती सेना जिल्हाप्रमुख सायली साळवी ,शहरप्रमुख श्वेता कापसे यावेळी उपस्थित होते.
उदय सामंत म्हणाले, पक्ष संघटनेच्या कामाबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे झोकून देऊन काम करतात. त्यांच्याप्रमाणे शिवसैनिकांनी काम करावे. त्यांचा आदर्श ठेवून काम केल्यास शहरात भगवेमय वातावरण होईल. मतदार याद्या तपासणीचे काम सुरू आहे. त्यावर बारकाईने लक्ष ठेवावे.
खासदार बारणे म्हणाले, महापालिका निवडणुकीत कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम संघटनेने केले. शिवसैनिकांनी केवळ पदाची अपेक्षा न ठेवता झोकून देऊन संघटना वाढीसाठी काम करावे. मला कोणते पद मिळाले नाही तर मी जातो अशी कोणी भूमिका घेऊ नये. शिवसेनेच्या विचाराशी एकरूप होऊन काम करावे. इतर पक्षापेक्षा शिवसेनेची कामाची पद्धत वेगळी आहे. शिवसेनेत विचारावर श्रद्धा ठेवून काम केले जाते.






