Uday Bhanu Chib : युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय भानू चिब यांच्या जामीनाला तातडीने स्थगिती; नेमकं काय घडलं?
भारत एआय इम्पॅक्ट समिटदरम्यान झालेल्या आंदोलनाप्रकरणी अटकेत असलेले युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय भानू चिब (Uday Bhanu Chib) यांना शनिवारी दिल्लीच्या दंडाधिकारी न्यायालयाने जामीन मंजूर केला.

Uday Bhanu Chib : भारत एआय इम्पॅक्ट समिटदरम्यान झालेल्या आंदोलनाप्रकरणी अटकेत असलेले युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय भानू चिब (Uday Bhanu Chib) यांना शनिवारी दिल्लीच्या दंडाधिकारी न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र, काही तासांतच दिल्ली पोलिसांनी या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान दिल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमित बन्सल यांनी जामिनाच्या आदेशाला स्थगिती दिली.
यामुळे चिब यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ६ मार्च रोजी होणार आहे. २० फेब्रुवारी रोजी भारत मंडपम येथे झालेल्या शर्टलेस आंदोलनाप्रकरणी चिब यांना अटक करण्यात आली होती. चार दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर शनिवारी पहाटे १ च्या सुमारास त्यांना ड्युटी मॅजिस्ट्रेट वंशिका मेहता यांच्या निवासस्थानी हजर करण्यात आले.
यावेळी पोलिसांनी दोन सह-आरोपींचा शोध घेण्यासाठी चिब यांच्या कोठडीत आणखी तीन दिवसांच्या वाढीची मागणी केली होती. मात्र, ठोस पुराव्याअभावी न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली. दंडाधिकारी न्यायालयाने आपल्या हस्तलिखित आदेशात महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले की, व्यक्तीचे जीवन आणि स्वातंत्र्य हा भारतीय राज्यघटनेचा आत्मा आहे.
जामीन हा नियम असून कारावास हा अपवाद आहे, असे स्पष्ट करत न्यायालयाने म्हटले की, निव्वळ तर्काच्या आधारावर कोणाचेही स्वातंत्र्य हिरावून घेतले जाऊ शकत नाही. चिब हे समाजात प्रतिष्ठित व्यक्ती असून त्यांच्या पळून जाण्याची शक्यता नाही, असेही न्यायालयाने नमूद केले होते.
न्यायालयाने त्यांना ५० हजार रुपयांचा जामीन बाँड आणि पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी या जामिनाविरुद्ध वरिष्ठ न्यायालयात धाव घेतली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमित बन्सल यांनी पोलिसांच्या याचिकेची दखल घेत जामीन आदेशाला स्थगिती दिली.





