Uday Bhanu Chib : शर्टलेस निदर्शनांवरून युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चिब यांना अटक करण्यात आली. दिल्ली पोलिसांच्या कारवाईने राजकीय वादळ घोंघावू लागले आहे. त्यातून कॉंग्रेस विरूद्ध भाजप असा राजकीय संघर्ष आणखी तीव्र बनण्याची चिन्हे आहेत. देशाची राजधानी दिल्लीत नुकतीच इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषद संपन्न झाली. त्या परिषदस्थळी युवक कॉंग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी शर्टलेस निदर्शने केली. कार्यकर्त्यांनी टी-शर्टस् हातांमध्ये घेऊन निदर्शने केल्याने सनसनाटी निर्माण झाली. त्या टी-शर्टस्वर केंद्र सरकार आणि भारत-अमेरिका व्यापार कराराचा निषेध नोंदवणाऱ्या घोषणा छापण्यात आल्या होत्या. निदर्शने करणाऱ्या काही कार्यकर्त्यांना तातडीने अटक करण्यात आली. आता कारवाई आणखी पुढे नेत दिल्ली पोलिसांनी चिब यांनाही अटक केली. त्यांचा उल्लेख पोलिसांनी शर्टलेस निदर्शनांचे कारस्थान रचणारा मुख्य सूत्रधार म्हणून केला. निदर्शनांवेळी देशविरोधी घोषणा देण्यात आल्या. तसेच, दंगलसदृश स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, असा ठपका ठेवण्यात आला आहे. अटकेनंतर चिब यांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. चिब यांच्यासह निदर्शनांबद्दल अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता ८ वर पोहचली आहे. चिब यांच्या अटकेनंतर पोलिसांनी दिल्लीतील महत्वाच्या ठिकाणांवरील सुरक्षा वाढवली. अटकेच्या निषेधासाठी निदर्शने होण्याची शक्यता विचारात घेऊन ते पाऊल उचलण्यात आले. कुठला अनुचित प्रकार घडू नये यासाठी शीघ्र कृती दल आणि निमलष्करी दलांच्या अतिरिक्त पथकांनाही सज्ज ठेवण्यात आल्याचे समजते.