Uday Bhanu Chib : भारत मंडपम येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’ दरम्यान झालेल्या आंदोलनाप्रकरणी अटकेत असलेले भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय भानू चिब (Uday Bhanu Chib) यांना शनिवारी दिल्ली न्यायालयाने जामीन मंजूर केला. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना पहाटे न्यायालयात हजर करण्यात आले होते, जिथे न्यायालयाने दिल्ली पोलिसांची कोठडी वाढवण्याची मागणी फेटाळून लावत चिब यांना दिलासा दिला. उदय भानू चिब (Uday Bhanu Chib) यांची चार दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर शनिवारी पहाटे १ च्या सुमारास त्यांना ड्युटी मॅजिस्ट्रेट वंशिका मेहता यांच्यासमोर हजर करण्यात आले. दिल्ली पोलिसांनी तपासासाठी चिब यांच्या कोठडीत आणखी सात दिवसांची वाढ करण्याची मागणी केली होती. मात्र, गुन्हे शाखेला कोठडी वाढवून मिळवण्यासाठी ठोस कारणे स्पष्ट करता आली नाहीत, असे ताशेरे ओढत न्यायालयाने पोलिसांची याचिका फेटाळून लावली आणि चिब यांना जामीन मंजूर केला. जामिनासाठीच्या अटी चिब यांच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने ५०,००० रुपयांच्या जामीन रोख्यावर त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. जामीन देताना न्यायालयाने काही कडक अटीही घातल्या असून, चिब यांना आपला पासपोर्ट आणि सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे तपास यंत्रणांकडे जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पोलिसांना त्यांच्या भूमिकेबद्दल अधिक चौकशी करायची असल्यास त्यांना सहकार्य करावे लागेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. नेमके प्रकरण काय? १६ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या जागतिक एआय समिटमध्ये दिग्गज उद्योगपती, धोरणकर्ते आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नेत्यांची मोठी उपस्थिती होती. २४ फेब्रुवारी रोजी या परिषदेच्या ठिकाणी युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. आंदोलकांनी शर्ट काढून खाली घातलेल्या टी-शर्टवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चित्रे तसेच भारत-अमेरिका व्यापार कराराच्या विरोधात घोषणाबाजी केली होती. या आंदोलनादरम्यान आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये बाचाबाची व झटापट झाली होती, ज्यावरून चिब यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.