उदयपूर – राजस्थानच्या शिक्षण विभागाने शाळांमध्ये चाकू, कात्री किंवा इतर धारदार वस्तू नेण्यास बंदी घातली आहे. उदयपूरमधील सरकारी शाळेत घडलेल्या चाकूहल्ल्याच्या घटनेतून धडा घेत शिक्षण विभागाने हे आदेश दिले आहेत. चाकू, धारदार कात्री किंवा कोणतीही धारदार वस्तू शाळेत आणण्यास सक्त मनाई आहे, असे विभागाने आदेशात म्हटले आहे.
अशी कोणतीही वस्तू आणणे हे शिस्तीचे उल्लंघन मानले जाईल, असे विभागाचे म्हणणे आहे. तसेच हा आदेश सूचना फलकावर लावण्याच्या सूचना शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांच्या दप्तर आणि इतर सामानाची नियमित तपासणी करण्याचे आदेश शिक्षकांना देण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी –
माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक आशिष मोदी यांनी माध्यमांना सांगितले की, पालक आपल्या मुलांना शाळेत शिकण्यासाठी पाठवतात. अशा परिस्थितीत शाळेचा परिसर हा विद्यार्थ्यांसाठी सर्वात सुरक्षित ठिकाण असायला हवा. तेथे कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होता कामा नये. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन शिक्षण विभागाने ही मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.
चाकूहल्ल्याच्या घटनेनंतर जिल्ह्यात तणावाचे वातावरण –
शुक्रवारी उदयपूर येथील सरकारी शाळेत दहावीच्या विद्यार्थ्याने आपल्या वर्गमित्रावर चाकूने वार केले होते. त्यामुळे जिल्ह्यात जातीय तणाव निर्माण झाला असून शुक्रवारी रात्रीपासून अनेक भागातील मोबाईल इंटरनेट सेवा 24 तास बंद ठेवण्यात आली होती. उदयपूरमधील सर्व सरकारी आणि खासगी शाळांमध्ये पुढील आदेशापर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
एजन्सीच्या अहवालानुसार, हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून आरोपी विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. दोन्ही विद्यार्थी अल्पवयीन आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.