नवी दिल्ली – दहशतवादविरोधी मोहीमेत भारताच्या खांद्याला खांदा लावून पूर्ण समर्थन देऊ, अशी ग्वाही संयुक्त अरब अमिरातच्या (यूएई) मंत्र्यांनी भारताच्या सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाला दिली. केंद्र सरकारकडून ऑपरेशन सिंदूरविषयीची भूमिका जागतिक मंचावर सक्षमपणे मांडण्यासाठी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातील सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाने आज गुरुवारी अबुधाबी येथे यूएईच्या मंत्र्यांसोबत चर्चा केली. सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ गुरुवारी सकाळी अबूधाबी येथे दाखल झाले. यूएई सरकारचे प्रतिनिधी महामहिम अहमद मीर खोरी आणि भारताचे राजदूत संजय सुधीर यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यूएई फेडरल नॅशनल काउंसिलचे संरक्षण आणि अंतर्गत व परराष्ट्र व्यवहार समितीचे अध्यक्ष डॉ. अली रशीद अल नुओमी व यूएईचे मंत्री शेख नह्यान मबारक अल नह्यान यांची भेट घेतली. या बैठकीत ‘ऑपरेशन सिंदूर’ या यशस्वी मोहीमेची माहिती देण्यात आली. डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, दहशतवादविरोधी मोहीमेत यूएई पूर्ण ताकदीनिशी भारतासोबत आहे, अशी ग्वाही दोन्ही मंत्र्यांनी दिली. भारत आणि यूएई हे दोन्ही देश चांगले मित्र आहेत. पहलगाम हल्ल्याचा सर्वात आधी यूएईकडून निषेध करण्यात आला होता. शिष्टमंडळाने यूएईच्या खासदारांना भारताची दहशतवादविरोधी भूमिका पटवून दिली. पहलगामचा हल्ला हा केवळ भारतावरचा नाही तर मानवतेवरचा हल्ला आहे. या हल्ल्याचा यूएईच्या खासदारांनी तीव्र शब्दांत निषेध केला. भारत आणि यूएई यांच्यातील संबंध केवळ व्दिपक्षीय व्यापारापुरता नसून दोन्ही देशांत सांस्कृतिक देवाणघेवाण होत आहे. यूएईमध्ये मंदिरं उभारली जात आहेत. मोठ्या संख्येने भारतीय यूएईमध्ये वास्तव्यास आहेत. त्यामुळे दोन्ही देशांनी दहशतवादाला कोणत्याही परिस्थितीत थारा द्यायचा नाही, अशी भूमिका घेतल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातील खासदारांचे शिष्टमंडळ ‘यूएई’नंतर काँगो, लायबेरिया आणि सीएरा लिओन या देशांना भेट देणार आहे. या शिष्टमंडळामध्ये मनन कुमार मिश्रा, डॉ. सस्मित पात्रा, ई. टी. मोहम्मद बशीर, एस. एस. आहलुवालिया, अतुल गर्ग, बांसुरी स्वराज आणि राजदूत सुजन आर. चिनॉय यांचा समावेश आहे.