Bhagyashree Koli Gold Medal : पुण्याच्या कन्येची व्हिएतनाममध्ये सुवर्ण भरारी! भाग्यश्री कोळीने आशियाई कुस्ती स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक
Bhagyashree Koli Gold Medal : भाग्यश्रीच्या या ऐतिहासिक सुवर्ण कामगिरीमुळे महाराष्ट्रातील असंख्य महिला मल्लांना एक नवी प्रेरणा मिळाली असून महाराष्ट्र कुस्ती संघटनेने तिचा सार्थ अभिमान व्यक्त केला आहे.

Bhagyashree Koli Wins Gold Medal : व्हिएतनाम येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘अंडर-२३ आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप २०२६’ स्पर्धेत भारताची स्टार महिला कुस्तीगीर आणि ‘ट्रिपल महाराष्ट्र केसरी’ भाग्यश्री मंगेश कोळी हिने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. भाग्यश्रीने ६२ किलो वजन गटात दिमाखदार आणि एकतर्फी कुस्त्या करत सुवर्णपदक जिंकून देशासह महाराष्ट्राची मान जागतिक पटलावर अभिमानाने उंचावली आहे.![]()
अंतिम सामन्यात कझाकस्तानच्या मल्लाचा उडवला धुव्वा! (Bhagyashree Koli Gold Medal)
स्पर्धेच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या अंतिम लढतीत भाग्यश्री कोळीने आपल्या अफाट कौशल्याचे प्रदर्शन करत कझाकस्तानच्या मातब्बर टायनिस डुबेक हिचा ४-० अशा स्पष्ट फरकाने पराभव केला. संपूर्ण सामन्यात कझाकस्तानच्या मल्लाला एकही गुण मिळवू न देता भाग्यश्रीने आशियाई चॅम्पियनशिपवर भारताचे नाव कोरले.
उपांत्य फेरीत किर्गिस्तानच्या मल्लावर केली होती मात – (Bhagyashree Koli Gold Medal)
अंतिम सामन्यापूर्वी उपांत्य फेरीतही भाग्यश्रीचा आक्रमक अंदाज पाहायला मिळाला होता. तिने किर्गिस्तानच्या कलगिरि बिलीमबेक किझी हिचा १२-२ अशा मोठ्या तांत्रिक फरकाने पराभव करून अंतिम फेरीत धडक दिली होती. याच गटातील दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत कझाकस्तानच्या टायनिस डुबेकने उझबेकिस्तानच्या मियासार कुशमुरातोव्हा हिचा १८-७ अशा फरकाने पराभव केला होता. त्यानंतर झालेल्या कांस्यपदकाच्या (Bronze Medal) लढतीत उझबेकिस्तानच्या मियासार कुशमुरातोव्हा हिने किर्गिस्तानच्या कालमिरा बिलिम किझी हिचा १०-० असा एकतर्फी पराभव करत पदक पटकावले.
पुण्याची कन्या; हरियाणात सराव आणि आता ‘मिशन ऑलिम्पिक २०२८’
महिला पैलवान भाग्यश्री कोळी ही मूळची कात्रज, पुणे येथील रहिवासी आहे. कुस्तीच्या जागतिक दर्जाच्या सरावासाठी ती सध्या रोहतक, हरियाणा येथे वास्तव्यास आहे. तिला तिथे नामांकित प्रशिक्षक पी. एन. मंदीप सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. ‘ट्रिपल महाराष्ट्र केसरी’चा किताब नावावर असणाऱ्या भाग्यश्रीचे आता पुढचे मुख्य ध्येय ‘ऑलिम्पिक २०२८’ मध्ये भारतासाठी पदक जिंकण्याचे आहे.






