वाघोली (प्रतिनिधी) – पुण्यातील कल्याण नगर मधील अपघाताचे प्रकरण ताजे असतानाच लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिट अँड रन चा प्रकार घडला आहे. दुचाकीवरून येणाऱ्या तीन युवकांना समोरून कार ने धडक देऊन गंभीर दुखापत केल्याप्रकरणी आरोपी नवनाथ चोरमले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात कुमार जयसिंग ढोरे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व त्याचे दोन मित्र नवनाथ ज्ञानेश्वर हरगुडे, विनायक ज्ञानेश्वर ढोरे हे पुणे नगर रोड लगत लोणीकंद तालुका हवेली, जि. पुणे येथील शौर्यवाडा हॉटेल येथे रात्री जेवण करून होंडा एक्टिवा स्कूटरने सव्वा दहा च्या सुमारास कोलते वेअर हाऊस समोरून जात असताना समोरून केसनंद कडून लोणीकंद कडे जाणारी टाटा टीगोर फोर व्हील MH12US3562 चा चालक नामे नवनाथ चोरमोले रा. शिरसवडी, हवेली, पुणे याने ताब्यातील कार ही हयगयीने व निष्काळजीपणे भरधाव वेगात रोडचे परिस्थिती कडे लक्ष न देता चालवून आम्हाला समोरून उजव्या बाजूला जोराची धडक दिल्याने सदर अपघातामध्ये ढोरे यांच्या उजवे पायाला गुडघ्याचे वरती मांडीत दोन ठिकाणी फॅक्चर होऊन गंभीर दुखापत झाली असून स्कूटर चालक विनायक ज्ञानेश्वर ढोरे याचे उजवे पायाला गंभीर दुखापत होऊन फॅक्चर झाले आहे. तसेच स्कूटरवरील मध्ये बसलेला नवनाथ ज्ञानेश्वर हरगुडे याचा पण उजवा पाय अपघातात फॅक्चर झाला आहे तसेच स्कूटरचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातग्रस्तांवर मनीपाल हॉस्पिटल खराडी पुणे येथे पुढील उपचार सुरू आहेत. नातेवाईकांचे आरोप.. अपघात प्रकरणातील कार मधील मद्यप्राशन केलेल्या दोघांना पोलिसांकडे ताब्यात दिले होते. यातील डोंगरगाव येथील गायकवाड नावाचा व्यक्ती आरोपी असल्याचे अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले होते. तरीदेखील पोलिसांनी दुसऱ्याच व्यक्तीला आरोपी केल्याचा प्रकार घडला असल्याचा आरोप अपघातग्रस्त यांच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच पोलिसांनी योग्य वागणूक दिली नसल्याचा आरोप केला आहे. वाहन चालक बदलण्याचा प्रकार उघडकीस.. नातेवाईकांच्या आरोपानंतर पोलिसांनी आरोपी नवनाथ चोरमले यांच्याकडे चौकशी केली असता हा गुन्हा त्यांनी केला नसल्याचे व गुन्हा अंगावर घेण्यासाठी डोंगरगाव येथील गायकवाड नावाच्या इसमाने दबाव टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गंभीर दुखापत करून अपघात केल्याच्या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपीकडे चौकशी करता दुसराच आरोपी असल्याची बाब देखील निष्पन्न झाली आहे. या प्रकरणात नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर संबंधित पोलिसांची देखील योग्य ती चौकशी होणार असून याबाबतीत वरिष्ठांना याबाबतचा अहवाल पाठवण्यात येणार आहे. – सावळाराम साळगावकर, (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे)