पिंपाडे खुर्द येथील अपघातात दुचाकीवरील दोन युवक ठार

वाठार स्टेशन – सातारा ते लोणंद महामार्गावरील कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे खुर्द हद्दीत कोरेगाव फाट्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. इंजिनियर असलेला स्वराज स्वरूपकुमार जानकर (वय 24, रा. पाडेगाव ता. खंडाळा) व वैद्यकीय शाखेत शिकणारा विद्यार्थी सुप्रीम सुभाष शिंदे (वय 24, रा. बलवडी ता. सांगोला, जि. सोलापूर) या दोघांचा या अपघातात मृत्यू झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्वराज जानकर बुलेटवरून (एमएच 12 टीई 3006) सोमवार दि. 6 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास साताऱ्याहून लोणंद दिशेने जात होता तर सुप्रीम शिंदे मोटरसायकलवरून (एमएच 45 एएस 3934) साताऱ्याच्या दिशेला येत असताना पिंपोडे खुर्द गावच्या हद्दीतील कोरेगाव फाट्यानजीक या दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळतात वाठार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताची नोंद वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात झाली आहे.





