Naxalite : गडचिरोलीत दोन महिला नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

गडचिरोली – नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर जहाल महिला नक्षल नेता तारक्कासह ११ जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते. यानंतर ८ जानेवारीला आणखी दोन जहाल महिला नक्षलवाद्यांनी हिंसक चळवळ सोडून मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला आहे.
कंपनी क्र. १० ची सेक्शन कमांडर शामला झुरु पुडो उर्फ लीला (३६,रा. गट्टेपल्ली ता. एटापल्ली) व भामरागड दलम सदस्य काजल मंगरु वड्डे उर्फ लिम्मी (२४,रा. नेलगुंडा) अशी त्यांची नावे आहेत. या दोघींवर मिळून तब्बल ५३ गुन्हे नोंद असून दहा लाखांचे बक्षीस होते. १ जानेवारीला जहाल नक्षलवादी नेता व केंद्रीय समिती सदस्य भूपती याची पत्नी विमला चंद्रा सिडाम उर्फ तारा उर्फ वत्सला उर्फ तारक्का हिच्यासह ११ जहाल नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले होते.
त्यानंतर आता आणखी दोन महिला नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. शामला पुडोवर महाराष्ट्र सरकारचे ८ लाखांचे, तर काजल वड्डेवर दोन लाखांचे बक्षीस होते. आत्मसमर्पणानंतर केंद्र व राज्य सरकारकडून या दोघींना पुनर्वसनासाठी अनुक्रमे साडेपाच लाख व साडेचार लाख रुपये असे बक्षीस मिळणार आहे.
नक्षलविरोधी अभियानचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, राज्य राखीव दलाचे उपमहानिरीक्षक (अभियान) अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, राज्य राखीव दलाच्या ११३ बटालियनचे कमांडंट जसवीर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसमर्पण मोहीम सुरु आहे.
दरम्यान, 2022 पासून तब्बल 46 कट्टर माओवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. पोलिसांनी केलेल्या तीव्र माओवादविरोधी कारवाया आणि नक्षलवाद्यांना हिंसाचाराचा मार्ग सोडून सन्मानपूर्वक जीवन जगण्याची राज्य सरकारने दिलेली संधीमुळे हे यश मिळाले आहे.





