कोथरूडमध्ये दुचाकी चोरांचा पर्दाफाश; पोलिसांनी 3 गाड्या जप्त करत दोघांना ठोकल्या बेड्या

पुणे : कोथरूड परिसरात दुचाकी चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या चोरट्यांकडून तीन चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
आकाश सुरेश वाघिरे (वय २१, रा. शिवाजीनगर रेल्वे स्टेशनजवळ, शिवाजीनगर) आणि आदित्य भारत जाधव (वय २१, रा. मनोहर क्लासिक बिल्डिंग, चंदननगर, खराडी), अशी अटक केलेल्या दोघा चोरट्यांची नावे आहेत. कोथरूडमध्ये नुकतीच एक दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. गस्तीवर असलेले पोलीस शिपाई योगेश सुळ यांना गोपीनाथ नगरातील मेघसृष्टी इमारतीजवळ वाघिरे आणि जाधव संशयास्पदरीत्या थांबल्याची खबर मिळाली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोघांना ताब्यात घेतलं.
चौकशीत कबुली, तीन दुचाकी जप्त-
चौकशीदरम्यान दोघांनी पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजीनगर भागातून एक दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पुढील तपासात त्यांनी कोथरूड आणि लोणी काळभोर परिसरातूनही दुचाकी चोरल्याचं उघड झालं. पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण तीन चोरीच्या दुचाकी जप्त केल्या.
पोलिसांची यशस्वी कारवाई-
ही कामगिरी कोथरूड पोलीस ठाण्याच्या टीमने पोलीस उपायुक्त संभाजी कदम आणि सहायक आयुक्त भाऊसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने, सहायक निरीक्षक रवींद्र आळेकर, उपनिरीक्षक मोहन चव्हाण, बसवराज माळी, योगेश सुळ आणि हनुमंत माळी यांच्या पथकाने या चोरट्यांना गजाआड करण्यात यश मिळवलं.





