पाकिस्तानातील स्फोटात दोन शिक्षक ठार
Updated On:

पेशावर: पाकिस्तानच्या उत्तरपश्चिमी प्रांतात रस्त्याच्या कडेला पेरून ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन त्यात दोन शिक्षक ठार झाले.
खैबर पख्तुनवाच्या बजौर जिल्ह्यात हे शिक्षक मोटारसायकलवरून जात असताना दमदोला भागातील रस्त्यावर पेरून ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन हा प्रकार घडला. यातील एक जण खासगी शाळेत तर दुसरा सरकारी शाळेत कामाला होता.
दोघांचा जागीच मृत्यू झाला. या स्फोटाची अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्वीकारलेली नाही, पण तेथे कार्यरत असलेल्या तालिबानी गनिमांकडून अशी घातपाती कृत्ये सतत सुरू असतात.
या प्रांतातून तालिबान्यांना हुसकावून लावल्याचा दावा तेथील सुरक्षा दलांकडून केला जात असला तरी अजूनही या भागात हे गनिम कार्यरत असल्याचे पुरावे अशा घटनांमधून मिळत आहेत.





