नगर – युक्रेनमधून दोन विद्यार्थी परतले; 23 प्रतीक्षेत

नगर – रशिया आणि युक्रेन यांच्यातील पेटलेल्या युद्धात नगर जिल्ह्यातील 25 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यापैकी दोन विद्यार्थी रविवारी सुखरुपपणे जिल्ह्यात पोहोचले.उर्वरित विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेले जिल्ह्यातील 25 विद्यार्थी तेथे अडकले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली होती. या विद्यार्थ्यांच्या नावाची यादी प्रशासनाने राज्य सरकारला कळविली.तसेच जिल्हा प्रशासनाने जिल्हा नियंत्रण कक्षाची स्थापना केली असून युक्रेनमध्ये कोणी नातेवाईक असल्यास संबंधितांनी तत्काळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले. रशिया व युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. युद्धस्थितीमुळे युक्रेनमधील स्थिती तणावजन्य बनली आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांची चिंता वाढली आहे. विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातील भरत तोडमल व अविष्कार मुळे हे दोन विद्यार्थी रविवारी युक्रेनमधून विमानाने मुंबईत पोहोचले. तेथून ते सुखरुपपणे घरी पोहोचल्याची माहिती प्रशासनाने दिली. नगरमध्ये येताच जोरदार स्वागत करण्यात आले. फुलांची उधळण करीत नातेवाईकांनी आनंदोत्सव साजरा केला.





