पुणे जिल्हा | कृषी विज्ञान केंद्राच्या फळ रोपवाटिकेला टू स्टार

नारायणगाव (वार्ताहर) – राष्ट्रीय बागवानी बोर्ड, गुरुग्राम (हरियाणा) यांच्याकडून नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राच्या फळ रोपवाटिकेला टू स्टार मानांकनाने सन्मानित करण्यात आले आहे.
ग्रामोन्नती मंडळाच्या कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत वसुंधरा फळ रोपवाटिका महाराष्ट्रातील शेतकर्यांसाठी मागणीनुसार गुणवत्तापूर्ण कलम व रोपे पुरवते. आंबा, पेरू, नारळ, सीताफळ, जांभूळ अशा विविध फळपीक आणि त्यांच्या शिफारस केलेल्या जाती शेतकर्यांच्या मागणीनुसार वर्षभर विक्रीसाठी उपलब्ध असतात. सर्व कलमे आणि रोपे केंद्राच्या प्रक्षेत्रावर लागवड केलेल्या मातृवृक्षापासून शास्त्रीय पद्धतीने तयार केलीली असतात.
कलमे आणि रोपे खरेदी व माहिती घेणार्या शेतकर्यांसाठी मोफत मार्गदर्शन केले जाते. याशिवाय शेतकर्यांच्या शेतात प्रत्यक्ष बांधावर जाऊन पीक उत्पादन वाढ आणि अडचणींवर मार्गदर्शन केले जाते. शेतकर्यांना चांगल्या गुणवत्तेची कलमे आणि रोपे उपलब्ध व्हावीत यासाठी केंद्राचे अध्यक्ष कृषिरत्न अनिल मेहेर यांनी फळपिकाची मातृवृक्ष रोपे, अत्याधुनिक यंत्रणा असलेले पाणी आणि खत प्रणाली,
वायरस मुक्त कलम निर्मितीसाठी इनसेक्ट नेट हाऊस, कमी खर्चिक टनेल यांसारख्या उपयुक्त सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या मिळालेल्या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष कृषिरत्न अनिल मेहेर, अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्यवाह रवींद्र पारगावकर यांनी केंद्राचे प्रमुख डॉ. प्रशांत शेटे, विषयातज्ज्ञ भरत टेमकर, प्रक्षेत्र प्रमुख वैभव शिंदे, अक्षय लांडे यांचे अभिनंदन केले आहे.
मानांकनामुळे नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राला महाराष्ट्रातील एक अग्रगण्य फळ रोपवाटिका म्हणून ओळख मिळेल आणि राज्यातील शेतकर्यांना उच्च दर्जाची कलमे आणि रोपे उपलब्ध करून देण्यासाठी प्रेरणा मिळेल. – अनिल मेहेर, अध्यक्ष, कृषी विज्ञान केंद्र





