Kuruli Land Fraud : कुरुळीत जमिनीचा मोठा ‘खेळ’! महिलेच्या बनावट सह्या करून १ कोटींचे कर्ज लाटले
Kuruli Land Fraud : कुरुळी येथील गट क्रमांक १४४/३ मधील सामाईक जमिनीवर मालकाची संमती नसतानाही श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेतून उचलले १ कोटींचे कर्ज.

Kuruli Land Fraud – सामाईक मालकीच्या जमिनीवर बनावट संमतीपत्र तयार करून एक कोटी रुपयांचे कर्ज उचलल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मंगला पठारे (वय 62) यांनी तक्रार दिली आहे. मौजे कुरूळी येथील गट क्रमांक 144/3 मधील 33 आर जमीन मंगला पठारे व श्रीकांत मोहन ठुसे यांच्या संयुक्त मालकीची आहे.
तक्रारीनुसार, 25 जुलै 2015 रोजी तक्रारदारांच्या अनुपस्थितीत बनावट संमतीपत्र तयार करून त्यांच्या खोट्या सह्या घेण्यात आल्या आणि त्याच्या आधारे श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेकडून एक कोटी रुपयांचे कर्ज उचलण्यात आले. ही बाब तक्रारदारांना 2023 मध्ये सातबारा उतार्यावरून समजल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी श्रीकांत मोहन ठुसे, संज्योत श्रीकांत ठुसे, संकेत श्रीकांत ठुसे, आदित्य शशिकांत ठुसे (सर्व रा. सर्व नारायणगाव) तसेच श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेतील संबंधित अधिकारी यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 467, 468, 471 व 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





