Pune News: सख्ख्या बहिणींची हत्या, आरोपीला फाशी द्या! राजगुरुनगर शहर बंदची हाक…

राजगुरूनगर : तालुक्यात दोन सख्या बहिणींना एका परप्रांतीय नराधम व्यक्तीने जीवे मारून टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली जात आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (28 डिसेंबर) राजगुरूनगर बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
तालुक्यातील या संतापजनक घटनेनंतर भटक्या विमुक्त जाती, जमाती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय कदम यांनी अमरण उपोषण सुरू केले आहे. या चिमुरड्यांचा खून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा, आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी. भटक्या विमुक्त जाती, जमाती यांना ॲट्रोसिटी कायद्यांतर्गत संरक्षण मिळावे, अशी मागणी संजय कदम यांनी केली आहे. त्यांच्या या आंदोलनाला नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.
नक्की प्रकरण काय?
राजगुरूनगर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बारमध्ये काम करणाऱ्या वेटरच्या खोलीमध्ये आठ आणि नऊ वर्षांच्या २ लहान मुलींचे मृतदेह पाण्याच्या बॅरलमध्ये सापडले होते. मयत असणाऱ्या दोन्ही सख्या बहिणी होत्या. त्यापैकी एकीवर नराधम अजय दास याने लैंगिक अत्याचार करून पाण्याच्या टाकीत बडवून त्यांची हत्या केली. आतापर्यंतच्या तपासात एका मुलीसोबत लैंगिक अत्याचार केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी राजगुरूनगर पोलिसांनी अजय दास (वय ५४, पश्चिम बंगाल) या आरोपीला अटक केली आहे.
दरम्यान, या घटनेची दखल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील घेतली आहे. चाकणकर यांनी या प्रकरणी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची भेट घेतली असून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले.
राजगुरूनगर व लोणावळा येथील घटना या अत्यंत दुर्दैवी आहेत. राजगुरूनगर येथील केस ‘फास्ट ट्रॅक’ कोर्टात चालेल. आरोपी हा त्या मुलींच्या ओळखीचा गैरफायदा घेत होता. त्या ओळखीचा गैरफायदा घेऊन या आरोपींनी या दोन्ही मुलीची हत्या केली असल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितले.





