लाल समुद्रात शरणार्थ्यांच्या दोन बोटी बुडाल्या, 45 मृत्यूमुखी

जिबूटी : आफ्रिकेतून युरोपात जाणाऱ्या शरणार्थ्यांच्या दोन बोटी लाल समुद्रात बुडून झालेल्या दुर्घटनेमध्ये किमान ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. संयुक्त राष्ट्राच्या शरणार्थी विषयक एजन्सीने ही माहीती दिली आहे. या बोटी येमेनवरून निघाल्या होत्या आणि त्यामध्ये ३१० जण प्रवास करत होते, असे इंटरनॅशनल ऑर्गनायजेशन फॉर मायग्रेशनने म्हटले आहे.
ही दुर्घटना जिबूटीच्या इशान्येकडील किनारपट्टीपासून अवघ्या १५० मीटर अंतरावर घडली. सोमवारी सकाळी या बोटी बुडाल्याचे समजताच संयुक्तपणे बचाव आणि मदतकार्याला सुरुवात करण्यात आली असून आतापर्यंत ११५ जणांना वाचवण्यात यश आले असल्याचे जिबूटीच्या तटरक्षक दलाने म्हटले आहे.
दरवर्षी आफ्रिका, मध्यपूर्व आणि दक्षिण आशियातले हजारो शरणार्थी धोकादायक मार्गांनी युरोपात जाण्याचा प्रयत्न करत असतात आणि असा दुर्घटनांमध्ये मरण पावतात, असे देखील या एजन्सीने म्हटले आहे.





