वाळू माफियांना सहकार्य करणं भोवलं; बीडमध्ये दोन पोलिस निलंबित

बीड – अवैध वाळू उपसा केल्याप्रकरणी आरोपींशी साठे लोटे करणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. हे दोन्ही पोलिस कर्मचारी बीडच्या गेवराई पोलिस ठाण्यातील आहेत. सहाय्यक फौजदार बलराम सुतार आणि पोलिस हवालदार अशोक हंबर्डे अशी निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. बीडचे नवनियुक्त पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
निलंबनाचे कारण काय?
सहाय्यक फौजदार बलराम सुतार आणि पोलिस हवालदार अशोक हंबर्डे यांना वाळूच्या दोन ट्रॅक्टरवर कारवाईचे आदेश देण्यात आले होते, तसेच वाळूसह गाडी देखील ताब्यात घेण्यास सांगितले होते. मात्र, यांनी वाळूसह गाडी ताब्यात न घेता केवळ वाहन ठाण्यात आणून लावले. तसेच गुन्हा दाखल करण्यास देखील विलंब केला. हा प्रकार म्हणजे आरोपींना सहकार्य करण्याचा होता. यामुळे पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांनी बलराम सुतार आणि अशोक हंबर्डे या दोन्ही कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमध्ये अवैध वाळू, राख तसेच खंडणी असे अनेक गुन्हे उघडकीस येत आहेत. त्यातच वाळू माफियाचा मुद्दा चांगलाच चर्चेत असताना अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांना दोन पोलिस कर्मचाऱ्यांना सहकार्य केल्याचे निदर्शनास आल्यावर पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.





