Shirur News : वाळू माफियांना चपराक! महसूलने घोड धरणातील दोन यांत्रिक बोटी उडवल्या

शिंदोडी : महसुल दिनाच्या पुर्व संध्येला महसूल विभागाने शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के तसेच पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या नेतृत्वाखाली २५ जणांचे पथक तयार करत चिंचणी (ता. शिरुर) येथील घोड धरणात बेसुमार वाळूउपसा करणाऱ्या दोन यांत्रिक बोटी आणि दोन फायबर स्फोटकाने उडवुन दिल्या.
शिरुर तसेच श्रीगोंदा महसूल आणि पोलिस प्रशासनाने हि संयुक्त कारवाई केली. न्हावरे येथील मंडल अधिकारी नंदकुमार खरात यांनी या कारवाईबाबत कमालीची गुप्तता बाळगत तीन ठिकाणी घोड नदीपात्रात पथक उतरवले. या पथकाने स्वयंचलित बोटीच्या साह्याने पाठलाग करत वाळु माफियांच्या यांत्रिक बोटी गाठल्या. या पाठलागचा थरार काही जागरुक नागरिकांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद केला. त्यानंतर वाळू माफियांच्या दोन बोटी आणि दोन फायबर जिलेटिनच्या साह्याने उडवून देण्यात आले.
या कारवाई पथकात मंडलाधिकारी नंदकुमार खरात, प्रशांत कांबळे, राजू बडे, योगेश टिळेकर, आदित्य गायकवाड, अक्षय तांबट, हर्षद साबळे, रुपेश रोट्टी, श्रीकांत आढाव, भालचंद्र पंडित, संदीप ढमढेरे, आलिशा महाकाळ आदींसह पोलिस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.





