नक्षलवाद्यांशी संबंध असलेले दोन पोलीस निलंबित

रायपुर – नक्षलवाद्यांशी संपर्क ठेवणाऱ्या छत्तीसगड पोलीस दलातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली आहे. सुकमा जिल्ह्यातील नक्षलवाद्यांना स्फोटके पुरवल्याचा त्यांच्यावर आरोप होता. आनंद जातव असे त्याचे नाव असून निलंबित करण्यात आलेल्या दुसऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव सुभाषसिंग असे आहे तो हेड कॉन्स्टेबल आहे.
त्यांच्या या कृत्यामुळे साऱ्या पोलीस दलाच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून त्यांना तातडीने सेवेतून काढून टाक्यात आल्याचे बस्तर रेंजचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात या जिल्ह्यात माओवाद्यांना मदत करणाऱ्या चार संशयितांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीत या पोलीस कर्मचाऱ्याच्या सहभागाची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.





