Pune Crime News: खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीकडून दोन पिस्तुले जप्त; भारती विद्यापीठ परिसरात गुन्हे शाखेची कारवाई
दोन काडतुसेही हस्तगत

पुणे : खुनासह आर्म अॅक्टचे गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराकडून गुन्हे शाखेच्या युनिट दोनने दोन पिस्तुले आणि दोन काडतुसे जप्त केली. अर्थव सोपान मारणे (वय १९, रा. राजविलास कॉम्प्लेक्स, भारती विद्यापीठ, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ८० हजार ८०० रुपये किमतीचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
बुधवारी (दि. १८) गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पथक पाहिजे आणि फरारी आरोपींसह अभिलेखावरील गुन्हेगारांची तपासणी करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार महेश मंडलिक आणि सर्जेराव सरगर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंद्रभागा चौकाजवळील महापालिकेच्या मैदानात एक तरुण बेकायदेशीररीत्या अग्निशस्त्रे घेऊन फिरत आहे.
या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने छापा टाकून अर्थव मारणे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन पिस्तुले आणि दोन काडतुसे आढळून आली. पोलिसांनी हा शस्त्रसाठा जप्त केला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५७४/२०२६ नुसार आर्म अॅक्ट कलम ३ (२५) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खुनासह आर्म अॅक्टचे गुन्हे दाखल
अर्थव मारणे हा अभिलेखावरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध आंबेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. तसेच सांगवी आणि चिखली पोलीस ठाण्यांत आर्म अॅक्ट कलम ३ (२५) अन्वये गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीकडे पुन्हा अग्निशस्त्रे आढळल्याने पोलिसांच्या कारवाईला महत्त्व प्राप्त झाले आहे.
या पथकाने केली कारवाई
अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल लोहार, महिला पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक शंकर नेवसे, पोलीस अंमलदार महेश मंडलिक, सर्जेराव सरगर, नागनाथ राख, ओमकार कुंभार, संतोष टकले, शंकर कुंभार, आशिष यादव आणि साधना ताम्हाणे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
Sidharth-Kiara: सिद्धार्थ-कियाराच्या लेकीचा व्हिडिओ व्हायरल; पापाराझींना केले महत्त्वाचे आवाहन





