Kedarnath: केदारनाथ येथे दरड कोसळून महाराष्ट्रातील दोन भाविकांचा मृत्यू

Kedarnath – केदारनाथच्या पायवाटेवर आज सकाळी डोंगरावरून मोठी दरड कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये दोघे महाराष्ट्रातील आहेत. याशिवाय या दुर्घटनेत अन्य आठ जण जखमी झाल्याची माहिती आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच, पोलीस प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले.
किशोर पराते (वय 31, नागपूर), सुनील काळे (वय 24, जालना) आणि अनुराग बिश्त (तिलवाडा, रुद्रप्रयाग) अशी मृतांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, गौरीकुंड-केदारनाथ ट्रेकिंग मार्गावरील चिरबासा परिसराजवळ सकाळी साडेसात वाजता हा अपघात घडला.
यावेळी डोंगरावरून मातीचा ढिगारा आणि मोठमोठे दगड खाली कोसळले. यानंतर ढिगाऱ्याखालून तीन भाविकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर इतर आठ जण जखमी झाले आहेत. या जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तथापि, दरड कोसळल्याची माहिती मिळताच एनडीआरएफ, डीडीआर आणि प्रशासनाच्या पथक हे यात्रा मार्गावरील तैनात असलेले सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मदत आणि बचाव कार्यास लगेच सुरुवात केली. दरम्यान, ढिगाऱ्याखाली काही यात्रेकरू अडकले असण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली.





