पाकिस्तानची दोन शिष्टमंडळे विदेश दौऱ्यावर रवाना; भारताविरोधातल्या तणावाबाबत मांडणार स्वतःची भूमिका

इस्लामाबाद – अलिकडच्या काळात भारताविरोधात झालेल्या लष्करी तणावाच्या संदर्भात आपली भूमिका जगभरातील देशांसमोर मांडण्यासाठी पाकिस्तानने आपली दोन शिष्टमंडळे विदेश दौऱ्यावर पाठवली आहेत. या दौऱ्यादरम्यान भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांदरम्यानच्या समस्या संवादाद्वारे सोडवण्याचे महत्व अधोरेखित करण्यात येणार आहे.
ही दोन्ही शिष्टमंडळे दोन वेगवेगळ्या दिशांना पाकिस्तानच्या भूमिकेचा प्रसार करण्यासाठी प्रवास करणार आहेत, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
भारताने पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर ३३ देशांच्या राजधानींमध्ये प्रवास करणारी ७ शिष्टमंडळे रवाना केली आहेत. त्या रणनितीनुसार पाकिस्तानने ही शिष्टमंडळे पाठवण्याचे ठरवले आहे. पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांच्या सूचनेनुसार पाकिस्तानची ही शिष्टमंडळे आजपासून न्यूयॉर्क, वॉशिंग्टन डीसी, लंडन आणि ब्रुसेल्स येथे जाणार आहेत.
यातील ९ सदस्यांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व पकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष आणि माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो करणार आहेत. तर पंतप्रधानांचे विशेष सहाय्यक सय्यद तारिक फतेमी यांच्या नेतृत्वाखाली आणखी एक शिष्टमंडळ २ जूनपासून मॉस्कोला भेट देणार आहे.
दोन्ही शिष्टमंडळे आंतरराष्ट्रीय संस्था, सार्वजनिक पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी, संसद सदस्य, थिंक टँक, प्रसिद्धी माध्यमे आणि स्थानिक समुदायाशी बैठका घेतील. भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे प्रश्न चर्चेद्वारे सोडवण्याबरोबर सिंधू पाणी करार तातडीने कार्यान्वित करण्यावर ही शिष्टमंडळे भर देणार आहेत.





