satara | पालिकेतील दोन कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

महाबळेश्वर, (प्रतिनिधी)- महाबळेश्वर नगरपालिकेतील दोन कर्मचारी प्रदीर्घ सेवेनंतर ३१ मे रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याबद्दल प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
कार्यालय शिपाई रमेश रोकडे व बोटमन सुरेश बिरामणे यांनी अनुक्रमे 38 व 40 वर्षे अशी प्रदीर्घ सेवा पूर्ण केली. त्यानिमित्त मुख्याधिकारी पाटील यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व देयकांचा धनादेश देऊन सत्कार केला.
मुख्याधिकारी योगेश पाटील म्हणाले, महाबळेश्वर नगरपालिकेच्या प्रगतीसाठी व नावलौकिक वाढविण्यासाठी 35ते 40 वर्षे प्रदीर्घ सेवा देऊन दिलेले योगदान कायम सर्वांच्या मनात राहील. दोन्हीही कर्मचाऱ्यांनी अतिशय विनम्रपणे नागरिकांची, पर्यटकांची सेवा केल्याचे योगेश पाटील यांनी सांगितले.
अशी सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांबद्दल आम्हाला अभिमान वाटतो, आपल्या जीवनातील सर्वाधिक कार्यकाळ नगरपालिकेच्या सेवेत व्यतित केला असल्याने ते नगरपालिका कुटुंबातील व्यक्ती झाले असून भविष्यातील सर्व प्रसंगात नगरपालिका त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली, अशी ग्वाही पाटील यांनी दिली.
यावेळी महापूर काळातील आठवणी सांगताना सुरेश बिरामणे (बोटमन) भावनावश झाले. दोन्ही कर्मचाऱ्यांचा सत्कार केल्यामुळे त्यांनी मुख्याधिकाऱ्यांचे आभार मानले. कार्यक्रमासाठी सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. संतोष दड यांनी सूत्रसंचालन केले.





