पुणे | आणखी दोन आंतरराष्ट्रीय उड्डाणे

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आता आणखी दोन आंतरराष्ट्रीय उड्डाणे होणार असून, दुबई आणि बँकाॅक या दोन देशांसाठी येत्या २७ ऑक्टोबरपासून विमानसेवा सुरू होणार आहे. त्यामध्ये दुबईसाठी दररोज, तर बँकाॅकला आठवड्यातील ३ दिवस विमान उड्डाण करणार असल्याने पुणेकरांना त्याचा फायदा होणार आहे.
पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनल सुरू झाले आणि विमान उड्डाणांची संख्या वाढली. त्याचबरोबर पुण्यातून आंतरराष्ट्रीय विमानसेवा वाढविण्याबाबत प्रवाशांकडून मागणी केली जात होती.
सध्या पुण्यातून दुबई आणि सिंगापूर याठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू आहे. त्यामध्ये स्पाइस जेटचे दुबईसाठी, तर सिंगापूरला आठवड्यातील ४ दिवस ही विमानसेवा सुरू आहे.
आता नव्याने सुरू होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानसेवेत इंडिगो कंपनीकडून दुबईसाठी दररोज विमान उड्डाण करणार आहे, तर बँकाॅकला आठवड्यातील तीन दिवस विमान उड्डाण करणार असून, त्याची वेळापत्रक ठरविले जाणार असून, या दोन्ही विमानसेवेमुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून पुणेकरांची मागणी आता पूर्ण होत आहे. पुण्याला दुबईसारखे महत्त्वाचे आर्थिक केंद्र थेट जोडले जात आहे. याचा निश्चितच पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राला फायदा होणार आहे.
पुणे आणि दुबईदरम्यान दैनंदिन मिळणारी कनेक्टिव्हिटी या दोन्ही शहरांचे अंतर कमी होऊन आर्थिक प्रगतीला नवे आयाम खुले होतील, असा विश्वास आहे. शिवाय बँकॉकसारखे पर्यटन केंद्रही थेट पुण्याशी जोडले जाणार आहे. मुरलीधर मोहोळ, केंद्रीय हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री





