Purandar Airport Project | पुरंदर विमानतळासाठी मोठी झेप! ; 91% क्षेत्रासाठी शेतकऱ्यांची संमती

प्रभात वृत्तसेवा
पुणे – पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आतापर्यंत सुमारे 91 टक्के क्षेत्राची संमतीपत्रे जिल्हा प्रशासनाकडे आली आहेत. सात गावातील 2 हजार 800 शेतकऱ्यांनी सुमारे 2 हजार 732 एकर क्षेत्रासाठी संमतीपत्रे जिल्हा प्रशासनाकडे दिली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. पुरंदर विमानतळासाठी 91 टक्के क्षेत्रासाठी संमती मिळवित जिल्हा प्रशासनाने मोठा टप्पा पार केला आहे.विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी या सात गावांमधील जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे.
पूर्वीच्या अधिसुचनेनुसार हे क्षेत्र २ हजार ६७३ इतके होते. आता त्यात १ हजार ३८८ हेक्टरची कपात करून हे क्षेत्र १ हजार २८५ हेक्टर करण्यात आले आहे. भूसंपादनासाठी दि.25 आॉगस्टपासून समंतीपत्र स्वीकारण्यास जिल्हा प्रशासनाकडून सुरूवात झाली. संमतीपत्रे स्विकारण्यास दि.18 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. या मुदतीत शेतकर्यांनी पुढे येत 91 टक्के क्षेत्रासाठी भूसंपादनासाठी संमती दिली आहे. मुदतीत संमतिपत्रे सादर करणाऱ्या जागा मालकांना दहा टक्के भूखंडाचा परतावा देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत 2 हजार 732 एकर जागेची संमतिपत्रे जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाली आहे.
– एकूण संपादन क्षेत्र : सुमारे तीन हजार एकर
– संमतीपत्र दिलेले क्षेत्र : सुमारे 2 हजार 732 एकर
– संमतीपत्रे दिलेले शेतकरी : सुमारे 2 हजार 800





