प्रतापगडच्या पायथ्याला आणखी दोन कबरी

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचा दुजोरा, माहिती घेऊन निर्णय
सातारा – शिवपराक्रमाचा साक्षीदार असलेल्या प्रतापगडच्या पायथ्याला अफजलखानाच्या कबरीव्यतिरिक्त आणखी दोन कबरी आढळून आल्या आहेत. परिसरात राबविण्यात आलेल्या अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेच्या दरम्यान या कबरींचे अस्तित्व आढळून आले आहे. या माहितीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दुजोरा दिला आहे.
नव्याने आढळलेल्या कबरीसंदर्भात योग्य ती माहिती घेऊन योग्य तो निर्णय तातडीने घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी जयवंशी यांनी स्पष्ट केले. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखान आणि सय्यद बंडा या दोघांच्या कबरीलगत असणारे अतिक्रमण जिल्हा प्रशासनाने 22 तासांची कारवाई करून हटवले. मात्र, या मोहिमेमध्ये दोघांच्या कबरीलगत काही अंतरावर आणखी दोन कबरी आढळून आल्या आहेत. अफजलखान आणि सय्यद बंडा यांच्या कबरीलगतची अतिक्रमणे काढत असताना काही अंतरावर आणखी दोन कबरी आढळून आल्याने प्रशासनही संभ्रमित झाले आहे. यातील एक कबर सेवेकऱ्याची असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, दुसरी कबर ही शिवकालीन नसल्याची माहिती समोर येत आहे.
या कबरीवर कोणतीही माहिती लिहिलेली नसून याबाबत जिल्हा प्रशासन अत्यंत काळजीपूर्वक माहिती घेण्याचे काम करत आहे. प्रतापगड पायथ्याशी अफजलखान कबरीजवळ असलेल्या अतिक्रमणावर प्रशासनाने बुलडोझर फिरवल्यानंतर कबरीचे स्वरूप पूर्वीसारखं दिसू लागले आहे. बांधकाम हटवल्यानंतर त्याचे स्पष्ट छायाचित्र समोर आले आहे. छत्रपती शिवरायांनी 10 नोव्हेंबर 1659 रोजी अफजलखानाचा वध केला होता. हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो. अनेक शिवप्रेमी संघटनांनी या अनधिकृत बांधकामाविरोधात आणि ते पाडण्यासाठी आंदोलने केली होती. कोर्टानेही अवैध बांधकाम पाडण्याचे निर्देश दिले होते. संवेदनशील प्रकरण असल्याने बरीच वर्ष कारवाई होऊ शकली नव्हती. नव्याने आढळलेल्या कबरीसंदर्भात योग्य ती माहिती घेऊन योग्य तो निर्णय तातडीने घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी जयवंशी यांनी स्पष्ट केले.





