पुण्याला दोन मेमूचे रेक द्यावेत; पुणे रेल्वेची बोर्डाकडे मागणी

पुणे – पुणे-दौंड मार्गावर धावत असलेली मेमू आता बंद होऊन डेमू सुरू होणार आहे. मात्र, प्रवाशांची मागणी लक्षात घेता पुणे रेल्वे विभागाकडून दोन मेमू रेक देण्यात यावेत, अशी मागणी रेल्वे बोर्डाकडे करण्यात आल्याची माहिती पुणे रेल्वे विभागाच्या डीआरएम इंदु दुबे यांनी दिली.
पुणे-दौंड मार्गावर पूर्वी आठ डब्यांची डेमू धावत होती. या मार्गावर धावणारे दोन डेमूचे रेक नादुरूस्त झाल्यामुळे दुरुस्तीसाठी पाठविण्यात आले होते. हे रेक येईपर्यंत भुसावळ येथून मेमूचा एक रेक मागविण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून १२ डब्यांची मेमू पुणे-दौंड मार्गावर धावत होती. आचानक मार्गावर मेमू धावू लागल्यामुळे प्रवाशांना आनंद झाला होता. तसेच, प्रवाशांची सोय देखील झाली होती.
पुणे-दौंड मार्गाला सबअर्बन घोषित करून या मार्गावर इलेक्ट्रिक मल्टीपल युनिट (ईएमयू) चालवावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात होती. त्यासाठी प्रवासी संघटनांकडून पाठपुरावा केला जात आहे. त्यामुळे पुणे रेल्वे विभागाने पुणे दौंड मार्गावर चालविण्यासाठी दोन मेमूचे रेक द्यावेत, अशी मागणी बोर्डाकडे केली आहे. मेमू गाडीमुळे प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे. तसेच, त्याचा रेल्वेला देखील जास्त प्रवासी मिळणार आहेत. त्यामुळे बोर्डाने देखील पुण्यासाठी मेमू अथवा ईएमयूचे दोन रेक द्यावेत, अशी मागणी प्रवासी संघटना करीत आहेत.





