Two Leopards Trapped : दोन बिबटे अन् एकच पिंजरा! शिरूरच्या हिवरे कुंभारमध्ये वन विभागाचा ‘डबल’ धमाका; पाहा काय घडलं
Two Leopards Trapped : एकाच पिंजऱ्यात दोन बिबटे अडकल्याने शिरूर तालुक्यात आश्चर्य; वन्यजीव बचाव पथकाकडून तातडीने बिबट्यांचा ताबा.

Two Leopards Trapped – शिरूर तालुक्यातील हिवरे कुंभार येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एकाच वेळी दोन बिबटे जेरबंद झाल्याची दुर्मिळ घटना घडली आहे. तालुक्यात बिबटे पकडण्याच्या अनेक कारवाया झाल्या असल्या तरी, एकाच पिंजऱ्यात दोन बिबटे अडकण्याची ही पहिलीच वेळ असल्याने या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे. हिवरे कुंभार व पिंपळे खालसा परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून पाळीव प्राण्यांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले होते.
याची दखल घेऊन वनविभागाने स्वप्नील धुमाळ यांच्या घराजवळ पिंजरा लावला होता. रविवारी (दि. १०) सकाळी या पिंजऱ्यात दोन बिबटे अडकल्याचे निदर्शनास आले. वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सोपान अनासुने, शेरखान शेख व वन्यजीव बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत दोन्ही बिबट्यांना ताब्यात घेतले. जेरबंद केलेल्या दोन्ही बिबट्यांची रवानगी जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारा केंद्रात करण्यात आली आहे.
“हिवरे कुंभार येथे एकाच पिंजऱ्यात दोन बिबटे अडकल्याची घटना दुर्मिळ असून मादी व बछडा एकाच वेळी भक्ष्याच्या शोधात पिंजऱ्यात गेल्याने ते अडकले असावेत. शिरूर तालुक्यात अशा प्रकारे एकाच वेळी दोन बिबटे पिंजऱ्यात सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे.”
– सोपान अनासुने, नियतक्षेत्र वनअधिकारी





