Leopards Captured: शिरूर तालुक्यातील बेट भागातील पिंपरखेड येथे मंगळवारी (दि. १४) पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास वनविभागाने दोन नर बिबट्यांना जेरबंद करण्यात यश मिळवले. जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्यांचे वय अनुक्रमे सात व आठ वर्षे असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे. रोहन बोंबे या शालेय विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या घटनेनंतर अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या बबन भिमाजी ढोमे यांच्या पाळीव श्वानावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले होते. या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीनुसार शेतकरी ज्ञानेश्वर बबन ढोमे यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आला होता. या पिंजऱ्यात पहाटेच्या सुमारास भक्षाच्या शोधात आलेला सात वर्षांचा बिबट जेरबंद झाला. तसेच पिंपरखेड (दाभाडेमळा) येथील शेतकरी बाबाजी नामदेव दाभाडे यांच्या शेतात लावलेल्या दुसऱ्या पिंजऱ्यात आठ वर्षांचा बिबट पकडण्यात आला. यापूर्वी दोन दिवसांपूर्वी वेताळेश्वर वस्ती परिसरातही एका बिबट्याला जेरबंद करण्यात आले होते. पकडण्यात आलेल्या तिन्ही बिबट्यांची माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात रवानगी करण्यात आली आहे. ही कारवाई वनरक्षक लहू केसकर, वनसेवक महेंद्र दाते तसेच बेस कॅम्पच्या सहकाऱ्यांनी संयुक्तपणे पार पाडली. आतापर्यंत सुमारे ४४ बिबट्यांना जेरबंद केले – दरम्यान, गेल्या सहा महिन्यांत पिंपरखेड परिसरात बिबट्यांच्या हल्ल्यांत शिवन्या बोंबे ही चिमुरडी आणि शालेय विद्यार्थी रोहन बोंबे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर सतर्क झालेल्या वनविभागाने आतापर्यंत सुमारे ४४ बिबट्यांना जेरबंद केले असून एका नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्तही करण्यात आला आहे. बिबट्यांना पकडण्याची मोहीम सुरू असली, तरी परिसरात पुन्हा बिबट्यांचे दर्शन होऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही मोहीम अखंडपणे सुरू ठेवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी बिबट्यांचे दर्शन होईल, त्या ठिकाणी पिंजरे लावण्यात येतील, असे वनविभागाने स्पष्ट करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.