Accident News : भीषण अपघातात दोघांचा मृत्यू; मिरज तालुक्यातील घटना; तिघे जखमी
Accident News : मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने मालवाहू आयशर वाहन चालकाने वाहनासह पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

सांगली : मिरज तालुक्यातील एरंडोली येथे ट्रकने दोन दुचाकींना धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला. तीन जण गंभीर जखमी झाले. मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने मालवाहू आयशर वाहन चालकाने वाहनासह पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोली येथील अंबा स्टॉप बसस्थानकाजवळ मालवाहू आयशर (केले २८-ए १७७६) भरधाव वेगाने येत होती. या वाहनाने प्रथम दुचाकीला (एमएच १० -बी ७२०५) जोरदार धडक दिली. त्यानंतर दुसऱ्या दुचाकीला धडक दिल्याने अपघाताची तीव्रता वाढली.
या अपघातात खाजवली अण्णासाहेब मिरजकर (वय ३७) आणि लक्ष्मण संतू हक्के (वय ६०) यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच रामचंद्र सीताराम नलवडे (वय ३८) आणि खाजासाहेब अण्णासाहेब मिरजकर (वय ३७) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर चालकाने वाहनासह घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुमारे एक किलोमीटर अंतरावर गावातील युवक आणि इतर वाहनचालकांनी पाठलाग करून आयशर वाहन अडवले. अपघातग्रस्त आयशरचा चालक इरिया रुद्रया गणाचार्य (वय २२) असून, क्लिनर आप्पासाहेब भास्कर नदाफ (वय २१) हे दोघेही जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून अपघाताचे नेमके कारण पोलीस तपासत आहेत. या भीषण अपघातामुळे एरंडोली परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.





