कॅनडाच्या नवीन मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या ‘या’ महिलांना मिळाली मोठी जबाबदारी, जाणून घ्या त्यांच्याविषयी

Canada PM Mark Carney’s Cabinet | कॅनडामधील सत्ताधारी लिबरल पक्षाने जस्टिन ट्रुडो यांच्या जागी मार्क कॉर्नी यांची नवीन पंतप्रधानपद म्हणून निवड केली आहे. कार्नी यांच्या मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या अनिता आनंद आणि दिल्लीत जन्मलेल्या कमल खेडा यांना स्थान मिळाले आहे.
बँक ऑफ कॅनडा आणि बँक ऑफ ब्रिटनचे माजी गव्हर्नर मार्क कार्नी यांनी कॅनडाचे 24वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. जानेवारीमध्ये ट्रुडो यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता कार्नी यांनी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्विकारला आहे.
अनिता यांना कॅनडाच्या मंत्रिमंडळात नवोन्मेष, विज्ञान आणि उद्योग मंत्री म्हणून, तर कमल खेडा यांना आरोग्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली आहे.
कमल खेडा यांच्याबद्दल सांगायचे तर दिल्लीत जन्मलेल्या खेडा यांचे कुटुंब शालेय शिक्षण घेत असताना कॅनडाला गेले. नंतर त्यांनी टोरंटोमधील यॉर्क विद्यापीठातून विज्ञान शाखेची पदवी मिळवली. कॅनडाच्या पंतप्रधानांच्या वेबसाइटवर उल्लेख आहे की खेडा या पहिल्यांदा 2015 मध्ये खासदार म्हणून निवडून आल्या. वेबसाइटनुसार, खेडा या संसदेत निवडून आलेल्या सर्वात तरुण महिलांपैकी एक आहेत. त्यांनी नर्स म्हणूनही काम केले आहे.
अनिता आनंद यांच्याबद्दल सांगायचे तर त्यांचे नाव पंतप्रधानपदाच्या शर्यतीत देखील होते. अनिता आनंद यांचा जन्म नोव्हा स्कॉशियाच्या केंटविले येथे झाला. त्यांचे आई-वडील सरोज डी. राम आणि एस.व्ही. (अँडी) आनंद, हे दोघेही भारतीय चिकित्सक होते. त्यांच्या दोन बहिणी गीता आणि सोनिया आनंद याही आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहेत.
अनिता आनंद यांनी 2019 मध्ये राजकारणात प्रवेश केला. 2019 मध्ये त्या पहिल्यांदा ओकव्हिलच्या संसद सदस्य म्हणून निवडून आल्या. यापूर्वी त्यांनी ट्रेझरी बोर्डाचे अध्यक्ष, राष्ट्रीय संरक्षण मंत्री म्हणून काम पाहिले आहे.




