जस्टिन ट्रुडो यांची जागा घेणार भारतीय वंशाच्या अनिता आनंद? पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर, जाणून घ्या त्यांच्याविषयी

Know Who is Anita Anand: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. यासोबतच, त्यांनी लिबरल पार्टी ऑफ कॅनडाचं नेतेपद देखील सोडले आहे. ट्रुडो हे 2015 मध्ये कॅनडाचे पंतप्रधान झाले होते. त्यानंतर सलग 9 वर्ष ते सत्तेत होते. अखेर, पक्षांतर्गत नसलेला पाठिंबा व अल्पमतातील सरकार यामुळे त्यांना पंतप्रधानपद सोडावे लागले आहे.
कॅनडामध्ये ऑक्टोबर 2025 मध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणामध्ये या निवडणुकीत ट्रुडो यांच्या पक्षाचा पराभव होऊ शकतो, असे समोर आले आहे. याशिवाय, आर्थिक धोरणांमुळेही त्यांच्यावर टीका होत होती. त्यामुळे राजीनामा देण्याचा दबाव वाढत गेला. नवीन नेत्याची निवड होईपर्यत ट्रुडो हे पंतप्रधान म्हणून काम पाहत राहण्याची शक्यता आहे.
त्यातच आता ट्रुडो यांच्यानंतर कॅनडाचा नवीन पंतप्रधान कोण होणार, याविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाच्या खासदाराचे नावे पुढे आहेत. हे नाव नाव अनिता आनंद यांचे आहे. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत पुढे असलेल्या अनिता आनंद कोण आहेत, त्याविषयी जाणून घेऊया.
कोण आहेत अनिता आनंद?
भारतीय वंशाच्या 57 वर्षीय अनिता आनंद या सध्या सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्या उच्चशिक्षित आहेत. त्यांच्या आई-वडिलांचा तामिळनाडू आणि पंजाबशी संबंध आहे. कोव्हिड-19 महामारीच्या काळात केलेल्या त्यांच्या कामगिरीचे विशेष कौतुक झाले होते.
अनिता आनंद यांनी क्विन्स विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदवीपर्यंतचे आणि त्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठातून न्यायशास्त्रात पदवी घेतली. डलहौसी विद्यापीठ आणि टोरंटो विद्यापीठातून त्यांनी कायद्याचे शिक्षणही घेतले. राजकारणात येण्यापूर्वी त्या टोरंटो विद्यापीठात कायद्याच्या प्राध्यापक होत्या. 2019 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता.
अनिता आनंद यांच्या व्यतिरिक्त जॉर्ज चहल या भारतीय वंशाच्या नेत्याचे नाव देखील पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहे. ते एक वकील आहेत. सोबतच, नैसर्गिक संसाधनावरील स्थायी समिती आणि शीख कॉकसचे अध्यक्ष देखील आहेत. या दोन नेत्यांव्यतिरिक्त क्रिस्टिया फ्रीलँड, मार्क कार्नी, डोमॅनिक लेब्लांक, मेलानी जोली, फ्रांस्वा-फिलिप शॅम्पेन आणि क्रिस्टी क्लार्क यांची नावे देखील पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहे.





