प्रभात वृत्तसेवा पुणे – भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावर शनिवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी ट्रक चालकाला हडपसर पोलिसांनी अटक केली.वैशाली विजय गलांडे (४९, रा. बालाजीनगर, धनकवडी) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी ट्रकचालक विजय मेवाराम यादव (४५, रा. कानपूर, उत्तर प्रदेश) याला अटक करण्यात आली. याप्रकरणी वैशाली गलांडे यांचा मुलगा यशोधन (२४) याने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशाली या पुणे- सोलापूर रस्त्यावरील एका हाॅटेलमध्ये व्यवस्थापक आहेत. त्या शुक्रवारी (३१ ऑक्टोबर) काम संपल्यानंतर मध्यरात्री पाऊणच्या सुमारास पुणे- सोलापूर रस्त्याने दुचाकीवरून घरी निघाल्या होत्या. कुमार मेडोस सोसायटीसमोर पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने त्यांना धडक दिली. अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. गलांडे यांच्या मागे मुलगा, पती असा परिवार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे यांनी दिली. महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू.. वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना लोहगाव परिसरात घडली. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकाविरुद्ध विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आयुष चंद्रकांत पुजारे (२१, रा. स्वामी समर्थनगर, साठे वस्ती, लोहगाव) असे मृत्यमुुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आयुषचे वडील चंद्रकांत यांनी विमानतळ पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुष हा लोहगाव भागातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. २७ ऑक्टोबर रोजी तो महाविद्यालयातून घरी निघाला असता, दादाची वस्ती परिसरात भरधाव वाहनाने दुचाकीस्वार आयुषला धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता वाहनचालक पसार झाला. त्याचा शोध सुरू असून, पोलिसंनी सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस निरीक्षक शिरसाठ तपास करत आहेत.