शिरूर : शिरूर तालुक्यातील आंबळे या गावात झालेल्या थरारक दरोडा प्रकरणाचा गुन्हे अन्वेषण विभाग व शिरूर पोलीस स्टेशनच्या संयुक्त तपास पथकाने पर्दाफाश केला असून या प्रकरणातील दोन सराईत दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे. संजय तुकाराम गायकवाड (वय ४५, रा. धनगरवाडी, भोकरदन, जि. जालना) आणि सागर सुरेश शिंदे (वय १९, रा. संत तुकाराम नगर, मंठा, जि. जालना) अशी या आरोपींची नावे आहेत. ६ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास सहा दरोडेखोरांनी आंबळे गावातील एका घरात घुसून दोन वृद्ध महिलांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यांच्याकडील गळ्यातील मंगळसूत्र, डोरले, कर्णफुले, जोडवी असे एकूण १.६४ लाख रुपयांचे दागिने जबरदस्तीने हिसकावून घेण्यात आले. यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी कल्पना प्रताप निंबाळकर (वय ६०, रा. आंबळे) यांनी शिरूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले, यात चोरट्यांनी सिल्व्हर रंगाची तवेरा गाडी वापरल्याचे निष्पन्न झाले. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी जालना जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगार संजय गायकवाड याचा शोध घेतला. तो साथीदारासह नगर-पुणे रोडने प्रवास करत असताना सापळा रचून पकडण्यात आला. चौकशीत त्यांनी आंबळे दरोड्यासह इतर पाच गंभीर गुन्ह्यांची कबुली दिली. संजय गायकवाड हा गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या असून त्याच्यावर जालना, नाशिक, औरंगाबाद, लातूर, परभणी, बीड, जळगाव आदी जिल्ह्यांत एकूण १३ गुन्हे दाखल आहेत. त्यात दरोडे, जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे आहेत. त्याच्यावर मोक्का कायद्यान्वये कारवाईही करण्यात आलेली असून तो पाच वर्षे तुरुंगात होता, नुकताच जामिनावर सुटला होता. या यशस्वी कारवाईमुळे पोलिसांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. तपास पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजू मोमीण, अतुल डेरे, सागर धुमाळ, तसेच शिरूर पोलीस स्टेशनचे नितेश थोरात, निखील रावडे, निरज पिसाळ, रविंद्र आव्हाड, अजय पाटील यांनी मोलाची भूमिका बजावली. सध्या या गुन्ह्यातील इतर साथीदारांचा शोध सुरू असून, आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांच्या या तात्काळ आणि प्रभावी कारवाईमुळे नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून, गावकऱ्यांनी याचे स्वागत केले आहे.