पुण्यातील कात्रज प्राणी संग्रहालयात केरळातून दोन गवे दाखल

कात्रज, दि. 5 (प्रतिनिधी) – केरळ मधील तिरुवनंतपुरम येथील त्रिवेंदम प्राणी संग्रहालयातून प्राणी अदला बदल योजनेअंतर्गत कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात दोन गवे आणण्यात आले आहेत. या बदल्यात एक भेकराची जोडी व एक आफ्रिकन ग्रे पोपट त्रिवेंदम प्राणी संग्रहालयाला देण्यात आला आहे. यातील नर तीन वर्षांचा तर मादी सहा वर्षांची आहे. तब्बल 1568 किलोमीटर प्रवास करीत हे गवे स्व.राजीव गांधी प्राणी संग्रहालयात दाखल झाले आहेत.
नॅशनल झू अथॉरिटी आणि महाराष्ट्र राज्य वन खात्याने या प्राणी संग्रहालयात तरस व गव्यांची जोडी आणण्याची परवानगी दिली होती. तरसाच्या खंदकाचे काम सुरू असल्याने तरस विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे. लवकरच तेही पर्यटकांना पाहण्याकरीता उपलब्ध होतील. पर्यटकांना आता गवे पाहता येणार आहेत. किट्टू आणि अविका, असे गव्यांच्या जोडीचे नाव असून तरसाचे नामकरण लवकर होणार आहे. प्राणी संग्रहालयामध्ये पूर्वीपासून एक गवा पर्यटकांना पाहण्यासाठी उपलब्ध होता. आता तीन गवे पाहण्यास उपलब्ध आहे.





