Chhatrapati Sambhajinagar Murder : छत्रपती संभाजीनगर शहरातील रामनगर भागात दोन मित्रांनी मित्राच्या छातीत चाकू भोसकून त्याची हत्या केली. या घटनेचा संपूर्ण थरार CCTV फुटेजमध्ये कैद झाला आहे. मयत तरुणाचे नाव विपुल चाबुकस्वार असे असून, आरोपी म्हणून आशिष चौतमल आणि सुबोध देहाडे (दोघेही मित्र) यांना मुकुंदवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप कळलेले नाही, मात्र वैमनस्य किंवा जुने वैर असण्याची शक्यता तपासात समोर येत आहे. नेमकं काय घडलं? दिवाळीच्या सकाळी (२१ ऑक्टोबर) रामनगर परिसरात ही घटना घडली. मयत विपुल चाबुकस्वार हा त्याच्या दोन मित्रांना भेटण्यासाठी रिक्षाजवळ पोहोचला. सुबोध देहाडे रिक्षेमध्ये बसला होता, तर विपुल आणि आशिष चौतमल रिक्षेबाहेर बोलत होते. बोलताना अचानक आशिषने खिशातून सूरा काढला आणि विपुलच्या छातीवर एकच वार केला. CCTV फुटेजनुसार, वार झाल्यानंतर विपुलला काही क्षणात रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि जागीच मृत्यू पावला. दरम्यान, मुकुंदवाडी पोलिसांना माहिती मिळाल्यावर त्यांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आणि दोघांनाही अटक केली. CCTV मधील स्पष्ट फुटेजमुळे पोलिसांना आरोपी शोधणे सोपे गेले. घटना CCTV मध्ये कैद झाल्याने पोलिस तपासाला वेग मिळाला. फुटेजमध्ये आशिषचा चाकू मारण्याचा प्रसंग स्पष्ट दिसतो, ज्यात विपुलचा चेहरा आणि आरोपींची ओळख पटते. हे व्हिडिओ पोलिसांकडे सादर झाले असून, ते न्यायालयात पुरावा म्हणून सादर केले जाणार आहेत. शहरात या घटनेमुळे भीतीचे वातावरण आहे, विशेषतः रामनगरसारख्या रहिवाशी भागात. स्थानिकांनी पोलिसांना बंदोबस्त वाढवण्याची मागणी केली आहे.