फलटण, (प्रतिनिधी) – फलटण नगर परिषदेत दोन अग्निशमन बुलेट दाखल झाल्या असून यामुळे शहरातील ज्या भागात अग्निशमन दलाचे मोठे आपतकालीन परिस्थितीत देखील जावू शकत नाही तिथे या बुलेट आग विझवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. या अग्निशमन बुलेटचे पूजन पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निखील मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निखील मोरे यांनी सांगितले की, फलटण नगर परिषदेच्या अग्निशमन विभागास महाराष्ट्र शासनाने अंतर्गत अग्निशमन विभाग सक्षमीकरण करण्यासाठी तसेच शहरातील ज्या भागात अग्निशमन वाहन जाऊ शकत नाही त्या ठिक़ाणी आग लागणे वा इतर दुर्घटना घडल्यास तातडीची उपाय योजना करण्यासाठी दोन अग्निशमन बुलेट मंजूर करण्यात आल्या होत्या. त्या अग्निशमन विभागात दाखल झाल्या आहेत. या अग्निशमन बुलेटमध्ये दोन फोम सिलेंडर तसेच गॅसचा एक सिलेंडर देण्यात आला असून अडचणी भागातील छोट्या स्वरुपातील आगी विझवण्यासाठी या बुलेटचा उपयोग होणार आहे. यावेळी पालिकेच्या अग्निशमन दलातील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कर्मचार्यांसह खुद्द मुख्याधिकारी निखील मोरे यांनी या बुलेटची टेस्ट राईड करुन पाहिली.