Solapur Rain : पीक गेल्याने दोन शेतकऱ्यांनी जीवन संपवले

सोलापूर – राज्यात सर्वत्र पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. शेतकऱ्यांनी आपली उभी पीके, जनावरे पाण्यात जाताना पाहीली आहेत. हाती आलेले पिक पाण्यात गेल्याने शेतकरी निराश झाला आहे.
दरम्यान, आता पिके पाण्यात वाहून गेल्याने बँकेचे कर्ज कसे फेडायचे या चिंतेत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
कारी (ता बार्शी) येथील तरुण शेतकरी शरद भागवत गंभीर (वय ३९) याने घराजवळ असणाऱ्या शेलवटीच्या झाडाला गळफास घेऊन जीव संपवले आहे. तर, दुसऱ्या घटनेत दहिटणे येथील शेतकरी लक्ष्मण काशिनाथ गावसाने यांनी गळफास घेवून जीवन संपवले.
शेती खर्चासाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचंय या विवंचनेत शरद होता. परिणामी त्याने बुधवारी सकाळी घराजवळ असणाऱ्या शेलवटीच्या झाडाला गळफास घेतला. या दोन्ही घटनांमुळे बार्शी तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दोन्ही घटनांची नोंद पोलिस ठाण्यात झाली आहे.





