Ranjangaon News | शेततळ्यात बुडून दोघांचा मृत्यू; दोघांवर उपचार सुरू

रांजणगाव- शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे सोमवारी (२८ जुलै) सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या चार बालकांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला असून दोघांवर शिरूर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अनमोल प्रविण पवार (वय १३) आणि कृष्णा उमाजी राखे (वय ८) अशी मृतांची नावे आहेत. आदेश प्रविण पवार (वय १४) व स्वराज गौतम शिरसाठ (वय १३) या दोघांवर उपचार सुरू आहेत. ही दुर्घटना सोमवारी सायंकाळी कारेगाव हद्दीतील बाभुळसर शिवारातल्या एका शेततळ्यावर घडली. पोहण्यासाठी गेलेल्या चौघांपैकी अनमोल आणि कृष्णा यांना बाहेर काढण्यापूर्वीच ते बुडाले.
घटनास्थळी उपस्थितांनी तत्काळ चौघांनाही रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी अनमोल आणि कृष्णा यांना मृत घोषित केले. या घटनेबाबत प्रदीप पवार यांच्या फिर्यादीवरून रांजणगाव एमआयडीसी पोलिसंनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस हवालदार गणेश आगलावे करीत आहेत.





