Uday Samant : शिरवाडेत दोन दिवसीय कुसुमाग्रज महोत्सवाचे आयोजन; मंत्री उदय सामंत यांची माहिती

नाशिक : ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या नावाने शिरवाडे येथे पुढील वर्षापासून दोन दिवसीय कुसुमाग्रज महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल. या महोत्सवात ग्रामस्थांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन उद्योग, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले.
मराठी भाषा विभाग, राज्य मराठी भाषा विकास संस्था आणि ग्रामपंचायत शिरवाडे- वणी (ता. निफाड) यांच्या संयुक्त विद्यमाने कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांचे गाव शिरवाडे- वणी कवितांचे गाव म्हणून घोषित करणे व कवितेच्या एका दालनाचे उद्घाटन आज झाले. त्यानंतर कुसुमाग्रज विद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे, वि. वा. शिरवाडकर यांच्या नात पिहू शिरवाडकर आदी उपस्थित होते.
उदय सामंत म्हणाले, कुसुमाग्रज यांचे गाव ‘कवितांचे गाव’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याचे पहिले दालन आज कार्यान्वित करण्यात आले. आगामी तीन ते चार महिन्यांत परिपूर्ण कवितांचे गाव निर्माण होईल. तेथे गावातील प्रत्येक विद्यार्थी गेला पाहिजे. त्यांनी कवितांचे वाचन केले पाहिजे. यामुळे वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यास मदत होईल. त्यामुळे अन्य गावांना प्रेरणा मिळेल, असे नियोजन करण्यात येईल. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शिरवाडे येथे दरवर्षी कार्यक्रम होईल.
नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धनीती आणि गनिमी कावा याविषयावर अध्यासन सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याबरोबरच आता तेथे कुसुमाग्रज यांच्या मराठी अध्यासन सुरू करण्यात येईल. ते लवकरच कार्यान्वित होईल, असेही त्यांनी सांगितले. आगामी काळात बाल, युवक आणि महिलांसाठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येईल. कवि विंदा करंदीकर साहित्यभूषण पुरस्कार वितरण सोहळा व्यापक स्तरावर घेण्याचे नियोजन केले आहे. मराठी भाषा विभागातर्फे संत तुकाराम महाराज यांचे सर्व अभंग ई- बुक स्वरूपात लवकरच येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.





