पिंपरी | कोविडकाळातील दोन कोटींची औषधे एक्सपायर

पिंपरी, (प्रतिनिधी) – कोविड महामारी काळात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयासह पालिकेची बहुतांश रुग्णालये कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी सुरु करण्यात आली होती.
रुग्णांना वेळेत औषधोपचार मिळावेत, यासाठी महापालिकेच्या भांडार विभागाकडून करोडो रुपयांचे रेमडेसीवीर इंजेक्शन, औषधे तसेच सर्जिकल साहित्य खरेदी करण्यात आले होते. त्यावेळी दुर्मीळ झालेल्या रेमडेसीवीर इंजेक्शन व औषधांची मुदत आज संपुष्टात आली आहे.
पुरवठादाराला इंजेक्शन तसेच औषधांची रक्कम देऊन एक्सपायर झालेल्या औषधांची विल्हेवाट लावली जाणार आहे. त्यामुळे महापालिकेला तब्बल १ कोटी ९६ लाख रुपयांचा भुर्दंड बसला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने २०२० ते २०२१ कोविड १९ महामारीच्या संकटावर मात करण्यासाठी शहरातील पालिकेची सर्व रुग्णालये कोविड रुग्णांसाठी खुली केली होती. रुग्णांची संख्या मोठी असल्यामुळे बेड उपलब्ध होत नव्हते. वेळेत ऑक्सिजन न मिळाल्यामुळे अनेकांचे बळी गेले.
रुग्णांना बरे करण्यासाठी डॉक्टरांकडून रेमडेसीवीर इंजेक्शन दिले जात होते. त्यासाठी महापालिकेने करोडो रुपयांची रेमडेसीवीर इंजेक्शन खरेदी केली होती. तरीही, त्या काळात इंजेक्शन मिळत नव्हते.
रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांच्या नातेवाइकांना काळ्या बाजारातून ३५ ते ४० हजार रुपयांना एक इंजेक्शन खरेदी करावे लागले. महापालिकेच्या तत्कालीन अतिरिक्त आयुक्तांना संपर्क साधल्यानंतर इंजेक्शन उपलब्ध होत होते. अन्यथा सामान्य नागरिकांना ते इंजेक्शन उपलब्ध होत नव्हते. इंजेक्शन अभावी अनेक रुग्णांचे बळी गेले.
पालिकेला भुर्दंड
महापालिकेने खरेदी केलेली तब्बल १ कोटी ९६ लाख ९५ हजार रुपयांची रेमडेसीवीर इंजेक्शन, औषधे, सर्जिकल साहित्यांची मुदत संपली आहे. आता ही औषधे उपयोगी पडणार नसल्याने त्याची विल्हेवाट लावण्याचा निर्णय वैद्यकीय विभागाने घेतला आहे.
तसा प्रस्ताव तयार करुन औषधे पुरवठा करणा-या पुरवठादाराला तब्बल एक कोटी ९६ लाख ९५ हजार एवढी रक्कम पालिकेकडून देण्यात यावी, अशी अट प्रस्तावात घालण्यात आली आहे.
ही औषधे उपयोगाची नसताना पुरवठादाराला पैसे द्यावे लागत असल्याने पालिकेला भुर्दंड बसला आहे. मंगळवारी झालेल्या स्थायी समिती सभेत आयुक्त शेखर सिंह यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.





