यवतमाळ : तालुक्यातील निमगांव येथील एका कुटुंबांतील दोन चिमुकल्यांचा घरासमोर असलेल्या कॅनालमध्ये साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. या दोन बालकांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. निमगांव येथील राम राठोड यांची मुलगी दिपावली सणानिमित्त माहेरी निमगांव येथे आली होती. त्याच दरम्यान त्यांच्या मुलीची मुलगी श्रावणी चव्हाण (३ वर्षे) आणि नातु स्वस्तिक राठोड (अडीच वर्षे) ही दोन बालके खेळत खेळत घरासमोर असलेल्या कॅनालकडे गेली. या कॅनालमधील एका खड्डयात पाणी साचलेले होते. खेळत-खेळत ही दोघे त्या पाण्यात पडली. थोड्या वेळाने मुले घरी दिसत नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी शाेधाशोध सुरु केली. संपूर्ण दिवसभर शोधाशोध केल्यानंतर घरासमोरील कॅनाल परिसरात पाहणी केली असता सायंकाळी साडेपाच वाजताचे सुमारास दोघांचेही मृतदेह कॅनालमधील खड्डयात साचलेल्या पाण्यात सापडले. या लहान बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. शेवटी पोलीस कारवाई पूर्ण करून त्या दोन बालकांचा मृतदेह निमगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवण्यात आला. परंतू तेथे उतरिय तपासणीची सोय नसल्यामुळे या दोन्हीही बालकांचे मृतदेह नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे निमगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.