जालना: वीजेच्या धक्क्याने शेतकऱ्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू; गावावर शोककळा

जालना: जालना तालुक्यातील वरुड गावात शेतकामादरम्यान वीजेच्या तारेचा धक्का लागल्याने शेतकरी विनोद मस्के आणि त्यांच्या दोन चिमुकल्यांचा मुलगा समर्थ आणि मुलगी श्रद्धा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना सोमवारी (९ जून ) घडली असून, संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
सध्या पावसाने दडी मारल्याने शेतकरी खरीप हंगामापूर्वीची कामे उरकण्यासाठी शेतात कुटुंबासह जात आहेत. विनोद मस्के आपल्या मुलांसह शेतात काम करत असताना त्यांना वीजतारेचा जोरदार धक्का बसला. या दुर्घटनेत तिघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तिघांना तातडीने जालना शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जालना सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहेत.
या घटनेमुळे वरुड गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा अकाली मृत्यू झाल्याने शेतकरी बांधवांमध्ये शोक व्यक्त होत आहे. वीजतारांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत असून, शेतकऱ्यांनी शेतात काम करताना काळजी घ्यावी, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे. या दु:खद घटनेनंतर गावकऱ्यांनी कुटुंबाला आधार देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पोलिसांनीही या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पथक पाठवण्यात आले आहे.





