डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी पुन्हा एकदा हादरली आहे. डोंबिवली एमआयडीसीमध्ये आज लागोपाठ दोन स्फोट झाले आहेत. या स्फोटानंतर आगदेखील लागली आहे. त्यामुळे आसपासच्या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. डोंबिवली स्टार कॉलनीमधल्या फेस-2 मध्ये हा ब्लास्ट झाला आहे. आतापर्यंत झालेले सगळेच ब्लास्ट या फेस-2 मध्ये झालेले आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार पेंट बनवणाऱ्या केमिकल कंपनीमध्ये हा ब्लास्ट झाला आहे. 222 नंबरच्या प्लॉटवर असणाऱ्या कंपनीमध्ये हा स्फोट झाला आहे, अशी माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे. सरकारकडून मात्र अजून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या ब्लास्टमुळे आसपासच्या परिसरात काळा धूर आणि केमिकलची दुर्गंधी पसरल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात आला आहे. जेव्हा या ठिकाणी आग लागली तेव्हा कंपनीमध्ये कर्मचारी काम करत होते, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. दुपारी 2.15 ते 2.30 वाजण्याच्या सुमारास कंपनीमध्ये हा ब्लास्ट झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. डोंबिवली एमआयडीसी भागात मागच्या दोन ते तीन महिन्यांमधला हा तिसरा ब्लास्ट आहे.