जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नगर – मुलीला पळवून नेल्याची विचारणा केल्याच्या रागातून दोघांवर चाकूने सपासप वार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. जामखेड शहरात घटना घडली. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात अनिल उत्तम पवार (वय 55), सुरेश अनिल पवार (वय 26, दोघे रा. जामखेड, जि. नगर) यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत मिथुन चंद्रकांत काळे व संतोष कान्हु पवार हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शनिवारी रात्री साडेआठ वाजता मिथुन काळे यांनी सुरेश पवार यास तू नातेवाईक मुलीस पळवून का नेले’, अशी विचारणा केली असता सुरेशला राग आला. सुरेश व त्याच्या वडिलांनी मिथुन काळे व संतोष पवार यांच्यावर चाकूने सपासप वार केले. यात काळे यांच्या छातीवर व पवार यांच्या पाठीवर गंभीर दुखापत झाली आहे. दोघांनाही उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींच्या जबाबावरून जामखेड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.